नाशिक - घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे भाविकांना दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. कुंभनगरी असलेल्या नाशिकमध्येही या निर्णयाचे भाविकांनी स्वागत केले आहे. दर्शनासाठी मंदिर प्रशासनाने नियमावली तयार केली आहे. सप्तशृंगी दर्शनासाठी कोरोना लसीचे दोन डोस किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट भाविकांसाठी बंधनकारक असणार आहे.
तुषार भोसले - भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख हेही वाचा -ऑनलाइन बुकिंग करून येणाऱ्या भाविकांनाच मिळणार साईदर्शन, शनिदर्शनासाठी ऑफलाइन पद्धत; वाचा नियमावली
- मंदिरे उघडावी यासाठी राज्यभर झाली आंदोलनं -
मंदिरांची नगरी ही नाशिकची ओळख आहे. काळाराम मंदिर, बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर, साडेतीन शक्तीपीठांपैकी एक सप्तशृंगी गड यांसह अनेक नावाजलेली मंदिरे नाशिक जिल्ह्यात आहेत. कोरोनाच्या दुसर्या लाटेत शासनाने मंदिरांसह सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. १५ ऑगस्टला राज्य अनलॉक करण्यात आले. मात्र, मंदिरे बंद होती. त्यामुळे मंदिरे भाविकांसाठी उघडावी यासाठी राज्यभर धार्मिक संघटनांनी आंदोलने केली होती. अखेर शासनाने घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरे खुली करण्याचा निर्णय घेतला.
- सप्तशृंगी दर्शनासाठी लसीचे दोन डोस किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक -
साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी गडावर भरणारी ' शारदीय नवरात्रोत्सव ' यात्रा यंदाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंदिरे खुले झाल्यानंतर भाविकांना कोविडच्या अटी - शर्तीनुसार दर्शनासाठी ऑनलाइन पास काढावा लागणार आहे. त्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस किंवा रॅपिड अँटीजन टेस्ट बंधनकारक असणार आहे. मंदिर भाविकांसाठी २४ तास खुले राहणार असून, मंदिरात वृद्ध व लहान मुलांसह गर्भवती महिलांना बंदी घालण्यात आली आहे.
- आनंदोत्सव साजरा करत देवाच्या दर्शनाला जाणार - भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले
गेल्या सहा महिन्यांपासून जुलमी आणि अधर्मी ठाकरे सरकारने आमच्या देवी-देवतांना कडीकुलपात बंद करुन ठेवले होते. पण आमच्या संघर्षामुळे या सरकारला आम्ही वठणीवर आणले. आता घटस्थापनेला मंदिराचे टाळे उघडणार आहेत. हा दिवस आम्ही आनंदाने साजरा करणार आहोत. राज्यभरातील सर्व मंदिरांमध्ये आमचे कार्यकर्ते ढोल ताशा, घंटा, शंख वाजवत, गुलाल उधळण करत देवाच्या दर्शनाला जातील. आम्ही देवाला प्रार्थना करु की, या अधर्मी सरकारला बुद्धी द्या, असे भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले म्हणाले.
हेही वाचा -7 ऑक्टोबरपासून साई मंदिर दर्शनासाठी खुले होणार; दररोज 15 हजार भक्तांनाच प्रवेश