नाशिक- गंगापूर रस्त्यावरील बापुला पुलावरून कार कोसळून दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, दोन किरकोळ जखमी झाले आहेत. 13 तारखेच्या मध्यरात्री ही घटना घडली असून गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
कार पुलावरून खाली कोसळल्याने दोघांचा मृत्यू हेही वाचा -नाशिकवर पसरली धुक्याची चादर; तापमानात सातत्याने घट
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 तारखेच्या मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास होंडा सिटी कार (क्र. एमएच 43 एल 4139) ही म्हसरूळकडून गंगापूर रोडच्या दिशेने येत होती. गोदावरी नदीवरील बापुलाजवळ कारचा वेग अधिक असल्यामुळे तेथील वळणावर कारवरील चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट गोदावरी नदीपात्रात कोसळली. या घटनेत कारचालक कल्पेश प्रभाकर मेश्राम (वय 28 ) व त्याचा मित्र भूषण मुरलीधर तिजारे (वय 28 ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगापूर रोडवरील हा पूल प्रेमी युगलांचा वावर, टवाळखोर व भरधाव वेगाने वाहन चालवणारे रोड रोमियोंसाठी प्रसिद्ध आहे. अनुचित प्रकार रोखण्यासाठी याठिकाणी पोलीस चौकी सुरू करण्यात आली होती. मात्र, काही कारणांमुळे ती बंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिवसभर या भागात गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.