दिंडोरी ( नाशिक ) - दिंडोरी येथील कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू असणाऱ्या दोघांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी डॉक्टर आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात आणि फुलांची उधळण करत त्या कोरोनामुक्त नागरिकांची पाठवणी केली.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास पाटील, डॉ. दीपक बागमार, डॉ. सम्राट देशमुख व ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी परिचारिका उपस्थित होत्या.
यापूर्वीही नाशिक येथे उपचार घेत असलेल्या निळवंडी व ईंदोरे येथील रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता नाशिक येथे दोन तर दिंडोरीत तीन रुग्णांवर उपचार सुरू असून तेही लवकरच बरे होऊन घरी परततील, असा विश्वास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजीत कोशिरे यांनी व्यक्त केला आहे.