नाशिक: नाशिकरोड येथे राहणारे जगन्नाथ लक्ष्मण कांबळे व रवींद्रनाथ लक्ष्मण कांबळे हे दोघे सख्खे भाऊ, नाशिकरोड येथील एका राजकीय पक्षाशी संबंधित नेत्याच्या भावाकडे कामाला होते. दोघे भाऊ या संशयित सावकाराकडे कर्जदारांकडून वसुलीचे काम करत होते. या दोघांकडून कर्ज वसूल होत नसल्याने सावकाराने दोघांना कर्जाची रक्कम फेडण्यासाठी तगादा लावला होता. या जाचाला कंटाळून दोघांनी विष घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. यात रवींद्रनाथ याचा मृत्यू झाला आहे. जगन्नाथची प्रकृती चिंताजनक आहे. या विरोधात मृताच्या नातेवाईकांनी संशयित सावकारावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी करता भेट चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. अचानक झालेल्या आंदोलनामुळे पोलिसांची धावपळ झाली. पोलीस प्रशासनाने नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने तणाव निर्माण झाला होता.
नातेवाईकांचा आरोप:रघुनाथ कांबळे यांनी सांगितले की, खासगी सावकारीच्या जाचाला कंटाळले होते. तर भीतीपोटी कांबळे बंधूंपैकी एक भाऊ काही दिवसांपूर्वी घर सोडून निघून गेला होता. नाशिकरोड पोलीस ठाण्यात या प्रकरणी मिसिंगची तक्रारही दाखल केली होती. यानंतरही वसुलीसाठी तगादा सुरूच असल्याने दोघा भावांनी आत्महत्याचे पाऊल उचलल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. राजकीय पक्षाच्या नावाने धमकी देणे, कुटुंबियांना शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे हे प्रकार सुरूच होते असे नातेवाईकांनी म्हटले आहे. खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून दांपत्याने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना इंदिरानगर परिसरात घडली होती. त्यानंतर सातपूर येथील एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकाराने शहरात सावकारी पाश घट्ट होत चालल्याचे धक्कादायक वास्तव दिसून येत आहे.