नाशिक - शहरातून बाहेर जाण्यासाठी लागणारा ई-पास प्राप्त करण्यासाठी लागणाऱ्या आरटीपीसीआर चाचणीचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या दोन सायबर कॅफे चालकांना अटक करण्यात आली आहे. चंद्रकांत मेतकर, राहुल कर्पे अशी या दोघांची नाव आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती आणि गुन्हे शाखेचे राहुल पालखेडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, नवीन सीबीएस येथे एका सायबर कॅफेमध्ये बाहेर जाण्यासाठी ई-पास काढून देण्याचे काम केले जात होते. या ई-पास सोबत अर्जदाराची आटीपीसीआर प्रमाणपत्र अनिवार्य असल्याने ते काढून देण्यासाठी अर्जदाराकडून प्रत्येकी पाचशे रुपये घेतले जात आहेत. अर्जासोबत हे बोगस प्रमाणपत्र जोडून पोलिसांकडूनही ई-पास मिळवून दिले जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने बनावट अर्जदार तयार करून, त्याला ई-पाससाठी अर्ज करण्यास सांगितले. संशयितांनी अर्जदाराला आरटीपीसी प्रमाणपत्र काढून देण्यासाठी पाचशे रुपयांची मागणी केली. पैसे घेताना दोघा संशयितांना पथकाने अटक केली. दोघांच्या विरोधात सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवराज बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.