नाशिक - येथे तुरडाळ शंभरी पार गेली असून अन्य डाळीही महागल्याने सर्वसामान्यांच्या महिन्याच्या आर्थिक बजेटवर परिणाम झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात ही भाववाढ झाल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये कांदा आणि भाजीपाल्यांचे भाव आधिच कडाडले असताना डाळींच्या भावात मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. तसेच नवरात्रोत्सवाच्या उपवासात वापरण्यात येणारी भगर आणि शेंगदाणेदेखील महागले आहेत. लॉकडाऊन काळात नोकऱ्या आणि व्यवसाय बंद पडल्याने अनेकांपुढे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा यक्षप्रश्न उभा राहिला आहे. यातच, सर्वत्र महागाईचा भडका उडाल्याने नागरिक होरपळून निघत आहेत. ऐन सणासुदीच्या काळात महागाई वाढल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
डाळींची आवक कमी झाल्याने तूरडाळींसोबत अन्य डाळींचे भाव 20 ते 25 रुपये प्रति किलोने वाढले आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक पीक वाहून गेल्याने डाळींची आवक कमी प्रमाणात झाली असून सर्वच डाळींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तुरडाळ 120 रुपये किलो झाल्याने खिचडीही बेचव झाली आहे.