नाशिक- सलग दुसऱ्यांदा मोठ्या मताधिक्क्याने निवडून आलेले हेमंत गोडसे यांनी नाशिकचा इतिहास मोडीत काढत विक्रम नोंदवला आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातून त्यांच्या मंत्रिपदासाठी विचार व्हावा यासाठी नाशिकमधील सामाजिक संघटना आणि गोडसे यांनी स्वतः प्रयत्न सुरू केल्याचे समजते.
नाशिकमधून 1962 साली लोकसभेत निवडून गेलेले यशवंतराव चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली होती. त्यानंतर आजपर्यंत नाशिकच्या पदरात केंद्रीय मंत्री पद आलेच नाही.
नाशिक हा शिवसेना आणि भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. नाशिक लोकसभा मतदारसंघातील 6 पैकी 3 भाजप तर 2 सेनेचे आमदार आहेत. असे असूनसुद्धा नाशिकला राज्यात देखील एक ही मंत्री पद देण्यात आले नाही. खासदार हेमंत गोडसे यांच्या रूपाने ही संधी केंद्र सरकारमध्ये मिळावी, यासाठी गोडसेसह इतर सामाजिक संघटनांकडून प्रयत्न केले जात आहे. नाशिकला मंत्री पद मिळाल्यास केंद्रातील योजना जिल्ह्यात येऊन विकासालाही हातभार लागेल, अशी अपेक्षा सामाजिक संघटनांमधून होत असून यासाठी लवकरच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटून हेमंत गोडसे यांना मंत्रीपद देण्याची मागणी करण्यात येणार आहे.
खासदार हेमंत गोडसे यांनी सलग दुसऱ्यांदा भुजबळ परिवारातील सदस्यांवर मोठा विजय मिळवला असून यंदा तर त्यांनी समीर भुजबळ यांच्यावर 2 लाख 90 हजार अधिक मतांनी बाजी मारली आहे. नाशिककरांनी स्वच्छ चेहरा, जनतेसाठी कायम उपलब्ध असणारे आणि स्थानिक राजकारणात हस्तक्षेप न करता केंद्र सरकारच्या विविध योजना आपल्या मतदारसंघात राबवल्याचे मतदारांनी बघितले आहे.
मागील पाच वर्षात खासदार गोडसे यांनी उडान योजनेअंतर्गत अनेक महत्त्वाची शहरे विमानाच्या माध्यमातून नाशिकशी जोडली आहेत. उद्योगासाठी इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब करणे, शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बाह्यवळण रस्त्याचे नियोजन, दिल्लीसाठी नाशिकहून राजधानी एक्सप्रेस, रेल्वे व्हील रिपेरिंग कारखाना मंजूर करणे, नाशिक - कल्याण लोकलची चाचणी यासारखी विकास कामे गोडसे यांनी केले आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची संधी दिली तर नाशिकच्या विकासाला अजून चांगले दिवस येतील असे म्हटले जात आहे.
खासदार हेमंत गोडसे यांना मंत्रिपद मिळण्याची आशा का वाढली आहे -
शिवसेनेतील मंत्रिपदाचे प्रमुख दावेदार असलेले माजी मंत्री अनंत गीते, माजी मंत्री आनंदराव अडसूळ, औरंगाबादमधून दोनदा खासदार म्हणून विजयी झालेले चंद्रकांत खैरे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची प्रतिनिधित्व केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचा यंदाच्या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे सध्याची स्थिती बघता नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले हेमंत गोडसे यांच्यासारख्या तरुण आणि उच्चशिक्षीत चेहऱ्याला मंत्रिपदाची संधी मिळेल अशी चर्चा सर्वत्र होताना दिसून येते.