नाशिक - पर्यटन, कृषी, चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधेबरोबरच आता चांगल्या आरोग्य सुविधेसाठीहीनाशिक जिल्हा संपूर्ण राज्यात ओळखला जातो. भविष्यात उत्तम व वाजवी आरोग्य सुविधांसाठी जगातून लोकांनी नाशिकला येणे पसंत करावे, यासाठी ‘मेडिकल टुरिझम हब’ निर्माण करणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
देवळाली येथील ट्रु केअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री भुजबळ बोलत होते. या हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या उपचारांबरोबर इतरही आजारांवर उपचार केले जाणार असल्याने स्थानिक नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या रुग्णालयात कोरोनासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांची उभारण्यात करण्यात आली आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये 50 आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे, त्याबरोबरच पुरूषांसाठी 30 व महिलांसाठी 20 जनरल बेड्स व्यवस्था करण्यात आली असून अद्यावत लॅब, सिटी स्कॅनसह 24 तास मेडिकलची सुविधा देण्यात आली आहे.