महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Trimbakeshwar Temple Controversy : हिंदुत्ववादी संघटनांनी केले त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण, महंत म्हणाले - 'यापुढे मंदिरात प्रवेश केला तर..

13 मे रोजी घडलेल्या घटनेनंतर आज हिंदुत्ववादी संघटनांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात गोमुत्र शिंपडून मंदिराचे शुद्धीकरण केले. तसेच यापुढे मुस्लिम धर्मीयांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व मशिदींमध्ये रुद्राभिषेक करू, असा इशारा महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिला आहे.

Trimbakeshwar Temple Controversy
त्र्यंबकेश्वर मंदिर वाद

By

Published : May 17, 2023, 6:12 PM IST

हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वर मंदिराचे शुद्धीकरण

नाशिक :त्र्यंबकेश्वर मंदिरात संदल मिरवणुकीदरम्यान दुसऱ्या धर्मातील व्यक्तींनी जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर आज हिंदू महासभा, नाशिक पुरोहित संघ, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ, ब्राह्मण महासंघ यासह वेगवेगळ्या हिंदू संघटनांचे प्रतिनिधी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिरून गुलाब पाणी, गोमुत्रासह शुद्धीकरण केले. तसेच हर हर महादेवचा जयघोष केला. यावेळी अनेकांनी भगवे वस्त्र, भगव्या टोप्या घालून हिंदू धर्म की जय यासह इतर घोषणा दिल्या. मंदिर शुद्धीकरण झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला होता.

पाच जणांवर गुन्हा दाखल :त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात त्र्यंबकेश्वर मंदिराचे जनसंपर्क अधिकारी रशवी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच संशयितांविरुद्ध हिंदू धर्मियांच्या भावना दुखावून सामाजिक सलोख्यास तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी भारतीय दंड विधान कायदा कलम 295, 511 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमचा हेतू चुकीचा नव्हता. संदल मिरवणूक मंदिरासमोर आल्यानंतर आम्ही नेहमी धूप दाखवत असतो. ही जुनी प्रथा आहे. आम्ही सर्व देवतांना मानतो. मिरवणूक काढणारे त्र्यंबकेश्वर परिसरात प्रसाद विकतात. धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या वस्त्रांची विक्री करतात. आमचे सर्व समाज आणि धर्मीयांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे वेगळे काही झाले असल्याचे वाटत असल्यास आम्ही माफी मागतो, असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींनी म्हटले आहे.

मशिदीमध्ये रुद्राभिषेक करू : त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदू व्यतिरिक्त इतर धर्मियांना प्रवेश बंदी असताना सुद्धा चार ते पाच जणांनी मंदिरात बळजबरीने जाण्याचा प्रयत्न केला, याचा आम्ही निषेध करतो. त्यानंतर सर्व हिंदू संघटनांनी मंदिराच्या पायरीवर गोमूत्र टाकून मंदिराचे शुद्धीकरण केले आहे. तसेच महाआरती केली. यापुढे मुस्लिम धर्मीयांनी मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व मशिदीमध्ये रुद्राभिषेक करू, असा इशारा अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी दिला आहे.

काय आहे प्रकरण? : त्र्यंबकेश्वर शहरात 13 मे रोजी रात्री एका धर्माच्या गटाकडून यात्रा काढण्यात आली होती. ही यात्रा मंदिर परिसरात थांबली. देवाला धुप दाखवू द्या, असा आग्रह त्या गटाने धरला. पुरोहितांनी त्याला विरोध दर्शविला. यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्र्यंबकेश्वर मंदिरात हिंदुधर्मियांशिवाय कुणालाही प्रवेश नाही. या प्रकरणी पुरोहित संघाने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी रविवारी शांतता समितीची बैठक बोलावत दोन्ही गटांना समज देऊन हा वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. या घटनाक्रमानंतर मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. Trimbakeshwar temple entry row: त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद -हिंदू महासभा
  2. Nashik Camel Herd : नाशिकमधील 'त्या' 146 उंटांचे राजस्थानात होणार पुनर्वसन, तब्बल 10 लाख येणार खर्च
  3. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश

ABOUT THE AUTHOR

...view details