नाशिक -आंतरजातीय विवाह केलेल्या इगतपुरी तालुक्यातील ( Nashik Interracial Marriage News ) आदिवासी प्रवर्गातील युवतीने ग्रामपंचायतीने शासकीय-निमशासकीय योजनांचा लाभ न घेण्याचे पत्र लिहुन घेतले आहे. असे त्या युवतीने सांगितले आहे. हे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान ग्रामपंचायत सदस्य आणि जात पंचायत सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निवेदन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ( Maharashtra Andhashraddha Nirmulan Samiti ) जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
हा अर्ज तरुणीकडून बळजबरीने लिहून घेतला असावा - नाशिक येथील तरुणीचा अर्ज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची प्रत आणि संबंधितांचे फोटो अंनिसने निवेदनासोबत जोडले आहेत. या अर्जात तरुणीने समस्त आदिवासी ठाकर समाज, महाराष्ट्र राज्य व ग्रामपंचायत रायंबे यांना लिहून दिलेल्या अर्जात ती म्हणते की, तिने एका अनुसूचित जातीच्या युवकाशी 5 एप्रिल 2022 रोजी दुपारी आंतरजातीय विवाह ( Tribal Girl Interracial Marriage nashik ) केला. मात्र हा विवाह करताना तिने आई वडिलांना विचारले नाही आणि आदिवासी समाजाच्या रूढी, परंपरांचे पालन केले नाही. त्यामुळे भविष्यात मिळणाऱ्या आदिवासी जमातीच्या शासकीय/ निमशासकीय योजनांचा लाभ घेणार नाही, असे अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे आम्हाला संशय आहे की, तरुणीने आंतरजातीय विवाह केला. त्याचा राग मनात ठेवून तिला शासनाच्या योजनांचा लाभ भविष्यात मिळू नये, यासाठी त्या आदिवासी समाजात छुप्या पद्धतीने कार्यरत असलेल्या जातपंचायतीने हा अर्ज तरुणीकडून बळजबरीने लिहून घेतला असावा, असे अंनिसने म्हटले आहे. विशेष म्हणजे हा अर्ज लिहून घेणाऱ्यांमध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचासह, इतर काही ग्रामपंचायत सदस्यांच्या आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्याही स्वाक्षर्या आहेत.