मनमाड (नाशिक) -जागतिक योग दिनानिमित्त, अंकाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्या ट्रेकर्स व वृक्षप्रेमी तरुणांनी आज किल्ल्यावर महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली योगासने केली. यानंतर किल्यावर वड, बेल, चिंच यासह आयुर्वेदिक वृक्षांची लागवड केली.
मनमाड येवला रोडवर अगदी हाकेच्या अंतरावर अंकाई टंकाई ही किल्ल्याची जोडगळ आहे. या ठिकाणी अगस्ती मुनी यांचे मंदिर आहे. हा किल्ला पुरातन काळातील म्हणून ओळखला जातो. तसेच हा परिसर निसर्गाने नटलेला आहे. यामुळे अंकाई किल्ला हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. पर्यटक सुट्टीच्या दिवशी तर काही ट्रेकर्स रोज येथे येतात. मनमाड शहरासह येवला, नांदगांव, चांदवड तसेच नाशिक, मालेगाव, धुळे येथून देखील गिर्यारोहक व पर्यटक येथे सहपरिवार येतात.
मनमाड येथील ट्रेकिंग ग्रुप व वृक्षप्रेमींनी जागतिक योग दिनाचे औचित्य साधुन, अगस्ती मुनी मंदिराचे महंत ज्ञानेश्वर माऊली यांच्या नेतृत्वाखाली योगा केला व त्यानंतर औषधी वनस्पतींच्या झाडांची लागवड केली. यावेळी महंत ज्ञानेश्वर माऊली यांनी योगा करण्याचे फायदे सांगितले. तर औषधी वनस्पतीची सर्वांनाच गरज भासते, त्यामुळे आपण राहतो त्या परिसरात जास्ती जास्त झाडांची लागवड करण्याचे आवाहन, महंत यांनी केले.