नाशिक -गंगापूर पोलिसांकडून शहरात टोसिलिझुमब या इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आले आहे. या टोळीकडून 2 लाख 60 हजाराची रक्कम पोलिसांनी हस्तगत केले आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली असून राज्यामध्ये पहिल्यांदाच टोसिलिझुमब या इंजेक्शनचा काळाबाजार करण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चार संशयित आरोपींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
टोसिलिझुमब इंजेक्शनचा काळाबाजार करणारी टोळी मागील काही दिवसापासून कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजन त्यानंतर रेमडेसिवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणावर सुरू होता. आता रेमडेसिवीरसोबत टोसिलिझुमब या इंजेक्शनचा वापर केला जात होता. परंतु आता या इंजेक्शनचा ही काळाबाजार होत असल्याचे राज्यमध्ये पहिल्यांदाच नाशिकमध्ये समोर आले आहे. या काळ्याबाजाराचा भांडाफोड नाशिकमध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्या सतर्कतेमुळे समोर आला आहे. त्यांनी याबाबतची माहिती मिळताच तातडीने गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ. मुदगल यांना दिल्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गंगापूर रोडवरील साफल्य हॉस्पिटल समोरील रस्त्यावर सापळा रचला आणि चार संशयित आरोपींची माहिती मिळाली होती. ते टोसिलिझुमब इंजेक्शन घेऊन आले. चाळीस हजार रुपयाचे इंजेक्शन चार लाख रुपयांना विक्री करणाऱ्या या टोळीला अखेर अटक करण्यात आले. या टोळीकडून प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार 2 लाख 60 हजार रुपयांची रक्कम देखील जप्त करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सुरु आहे.
असा रचला सापळा
एका रुग्णालयाच्या बाहेर इंजेक्शनचा काळाबाजार करण्यासाठी काही संशयित येणार असल्याची गुप्त माहिती गंगापूर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाला मिळाली. पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांसह याठिकाणी सापळा रचला. बनावट ग्राहक तयार करुन संशयितांसोबत संपर्क करत ठरलेल्या ठिकाणी बोलविण्यात आले. तेथे एका स्विफ्ट कारमधून ( एम एच 15 एफ एन 5055) संशयित प्रणव केशव शिंदे (२४, रा.लक्ष्मणरेखा सोसायटी, पंचवटी), संकेत अशोक सावंत (२५, रा.न्यू तेजश्री अपार्टमेंट, मखमलाबाद नाका, पंचवटी) हे आले. यावेळी बनावट ग्राहकाने मागणी करत इंजेक्शन ताब्यात घेतले असता अन्न व औषध प्रशासनासाच्या निरीक्षकांनी कारमध्ये बसलेल्या तरुणांना औषधविक्रीचा परवाना मागितला असता त्यांनी नकार दिला. यावेळी पोलिसांनी कारला घेराव घालत दोघांना ताब्यात घेतले. यावेळी प्रणवच्या अंगझडतीत 40 हजार 600 रुपये किंमतीचे एक इंजेक्शन पोलिसांना मिळाले. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली 3 लाखांची मोटार, आठ हजारांची रोख रक्कम, महागडे मोबाईल असा सुमारे 4 लाख सहाशे रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. सुरेश साहेबराव देशमुख (४५) यांच्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन साथीदारांचा पोलीस शोध घेत असून त्यांनाही लवकर अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.
हेही वाचा -नाशिकमध्ये आईचा कोरोनाने मृत्यू, तरुणीने कोव्हिड सेंटरमध्येच सॅनिटायझर घेऊन केली आत्महत्या