नाशिक -शहरातील वाढती रुग्णसंख्या देशात अव्वल आल्याने आता नाशिक शहरात पूर्ण लॉकडाऊनची मागणी वाढली आहे. राज्यात लॉकडाऊनला भाजपाचा विरोध असला तरी नाशिकमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाच्या महापौरांनीच पालक छगन भुजबळ यांना पत्र लिहून नाशिकमध्ये लॉकडाऊनची मागणी केली आहे. देशभरातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वाधिक प्रादुर्भाव होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात यावे, अशी मागणी नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांनी केली.
लॉकडाऊन केल्यास प्रादुर्भाव नियंत्रणात येण्यास मदतच -
राज्यामध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत असल्याने अनेक पक्ष संघटनांकडून राज्यात कडकडीत लॉकडाउन लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडून लॉकडाऊनचा कडाडून विरोध करण्यात येत असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. मात्र, असे असले तरी नाशिक महापालिकेमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाकडूनच लॉकडाऊन करण्याची मागणी करण्यात आली आहे. महापौर सतीश कुलकर्णी यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे. शहरातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता हाच अखेरचा पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी नक्कीच मदत होईल, असा विश्वासही व्यक्त केला आहे.
भुजबळ काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष -
नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्या ही दररोजच हजारोंच्या पटीने वाढत आहे. यात सर्वाधिक बाधित हे नाशिक शहरात आढळून येत असल्याने आता यापुढे आरोग्य यंत्रणादेखील तोकडी पडत असल्याचे चित्र आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्वपक्षीयांच्या बैठका होऊन लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे. तर दुसरीकडे शहरातील व्यापाऱ्यांनीही स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू लागू केला. तसेच हा प्रादुर्भाव नियंत्रणात यावा म्हणून कडकडीत संचारबंदी हाच पर्याय असल्याचे मत व्यक्त होत आहे. या परिस्थितीत महापौर सतीश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या पत्रावर पालकमंत्री छगन भुजबळ काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.