नाशिक - देशाची हवाई सुरक्षा करणाऱ्या सुखोई आणि मिग विमानांची देखभाल करणारा नाशिक हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना 28 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. या कारखान्यात कर्मचारी आणि वसाहतीमध्ये अनेक कर्मचाऱ्यांची कुटुंब कोरोनाबाधित झाली आहेत. आतापर्यंत एकूण चौदा कर्मचाऱ्यांचा तर त्यांच्या कुटुंबातील अनेकांचा मृत्यू झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून रोज हजारो कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे.त्यामुळे नाशिकच्या ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कारखाना गेल्या मंगळवारपासून बंद असून तो पुढे 28 तारखेपर्यंत बंद राहणार आहे. सध्या कर्मचारी आणि त्यावर अवलंबून असलेले असे २५० जण बाधित आहेत. त्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्याची मागणी कर्मचारी संघटना करत आहेत.