महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

कानडवाडी येथे राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. मात्र चिमुकलीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.

By

Published : Jun 23, 2021, 6:43 PM IST

three year old girl died in leopard attack in igatpuri nashik
नाशिक: बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

नाशिक - इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी येथे राहणाऱ्या एका तीन वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली होती. मात्र चिमुकलीची मृत्युशी झुंज अपयशी ठरली आणि तिचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.


नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी भागात, राहणाऱ्या खडके कुटुंबातील गौरी गुरुनाथ खडके (वय 3) ही मंगळवारी 22 जूनच्या रात्री घरच्या दाराजवळ आईच्या शेजारी बसली असताना अचानक बिबटयाने हल्ला करून तिला जवळच असलेल्या जंगलाच्या दिशेने ओढत नेलं. ही सर्व घटना मुलीचे आई, वडील, आजोबा यांच्या समक्ष घडली असता त्यांनी आरडा ओरडा केल्याने व त्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने काही अंतरावर झुडपात मुलीला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात तिच्या मानेला खोलवर जखमा झाल्याने तिला ग्रामस्थांनी व वन कर्मचारी यांनी तात्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं.

प्रथमोपचार करून वैद्यकीय अधिकारी यांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासठी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र काही तासातच उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला. यामुळे इगतपुरी तालुक्यात शोककळा पसरली आहे. मनुष्यावर हल्ले करणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

नाशिकचे निफाड, सिन्नर, इगतपुरी बिबट्याचे हॉटस्पॉट
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून ह्या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आलं आहे.

हेही वाचा -कांदा व्यापाऱ्याची दादागिरी, रोख पैसे मागितल्याने शेतकऱ्याला मारहाण

हेही वाचा -नाशिक : भोंदू बाबाने घातला अनेकांना गंडा, घटनास्थळावरून बनावट नोटा जप्त


ABOUT THE AUTHOR

...view details