नाशिक(दिंडोरी) - तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या ९ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. इंदोरे आणि मोहाडी येथील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील सव्वीस नागरिकांपैकी इंदोरे येथील दोन पुरुष व मोहाडी येथील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दरम्यान इंदोरे येथील कोरोनाचा पहिला रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. सध्या आठ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी 13 कोरोना संशयित व्यक्तींना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचे आणि त्यांची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
दिंडोरी तालुक्यातील इंदोरे येथे मुंबई येथून आलेल्या आरोग्य सेवक असणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. हा रुग्ण उपचारानंतर बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र, त्याच्या संपर्कातील एकूण चार जण बाधित झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी दोन तर आज पुन्हा दोनजण पॉझिटिव्ह आले आहेत.
निळवंडी येथीलही एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्याच्या संपर्कातील सर्व नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मोहाडी येथील एका शेतकऱ्याला कोरोना झाला होता. त्यांच्या कुटुंबातील एका महिलेचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मोहाडीतील रुग्णसंख्या दोन झाली आहे.
रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांना विलगीकरण कक्षात नेवून त्यांच्या तपासण्या करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे. मोहाडी आणि इंदोरे येथे सर्वेक्षण तपासणी मोहीम सुरू आहे. प्रांताधिकारी डॉ. संदीप आहेर, तहसीलदार कैलास पवार, गटविकास अधिकारी चंद्रकांत बाविस्कर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुजित कोशिरे, अधीक्षक डॉ. विलास पाटील, पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे हे सर्व मिळून विविध उपाययोजना करत आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.