मनमाड(नाशिक)- गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील मनमान नांदगाव परिसरात पावसाने हाहाकार माजवला आहे. नाशिकच्या ग्रामीण भागात मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. परिणामी नदी, नाल्याना पूर आले आहेत. तसेच दरेल, सकोरा या ठिकाणी तीन पाझर तलाव फुटल्याची घटना घडली आहे. या तलावाच्या पाण्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान या नैसर्गिक आपत्तीमध्ये वित्तहानी झाली असली तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नांदगाव, यासह नाशिकच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून मंगळवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मेघगर्जना व विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने या भागाला अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. जोरदार पावसामुळे अनेक नदी नाल्यांना पूर येऊन ते दुथडी भरून वाहत आहेत. नांदगाव शहरातून वाहणारी लेंडी व शाकंबरी नदीला पूर आल्याने पुराचे पाणी नदी काठच्या गावात शिरले आहे.