नाशिक - जिल्ह्याच्या पेठ तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून मृत्यू झाला. यामध्ये दोन सख्ख्या बहिणींचा समावेश होता. निशा पंढरीनाथ किलिबले (वय 9, रा. उभीधोंड), योगिता पंढरीनाथ किलिबले (वय 12, रा. उभीधोंड) व पूनम संतोष बोके (वय 13, रा. अंबापूर) अशी मृत्यू झालेल्या तिघींची नावे आहेत.
पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा तलावात बुडून मृत्यू, दोन सख्ख्या बहिणींचा समावेश - नाशिकमध्ये पाझर तळ्यात बुडून तिघींची मृत्यू
निशा, योगिता व पूनम या तिघी बुधवारी दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना खोल पाणी व गाळ याचा अंदाज न आल्याने त्या पाण्यात बुडाल्या. एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघींचाही मृत्यू झाला.
याबाबत अधिक माहिती अशी की, निशा, योगिता व पूनम या तिघी बुधवारी दुपारच्या सुमारास खंबाळे शिवारातील पाझर तलावात पोहण्यासाठी गेल्या होत्या. आंघोळ करत असताना खोल पाणी व गाळ याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडू लागल्या. एकमेकींना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघींचा मृत्यू झाला. दरम्यान, काठावर असलेल्या एका मुलीने आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन मुलींना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, यश आले नाही. तिघींना पेठ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. उत्तरीय तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
मृतांपैकी योगिता व निशा या दोघी सख्ख्या बहिणी असून निशा ही अंबापूरच्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीत तर योगिता व पूनम ह्या पेठ येथील जनता विद्यालयात अनुक्रमे सहावी व सातवीत शिक्षण घेत होत्या. याबाबत पेठ पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संदिप भोसले, पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांना धीर दिला. तीनही मुलींचा असा दारूण अंत झाल्याने बोके व किलबिले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.