नाशिक - देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी नाशिक पोलीस आयुक्तालयाला निनावी पत्राव्दारे मिळाली आहे. यामुळे रेल्वे सुरक्षा पोलीस प्रशासनासह स्थानिक पोलीस प्रशासनही सतर्क झाले आहे. याची खबरदारी म्हणून नाशिक बॉम्ब शोधक पथकाकडून देवळाली रेल्वे स्थानकाचा परिसर श्वान तसेच धातुशोधकाच्या मदतीने तपासण्यात आला.
सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की आयुक्तालयाला निनावी पत्राव्दारे २ दिवसांमध्ये देवळाली कॅम्प रेल्वे स्थानक बॉम्बद्वारे उडवून देण्याची धमकी मिळाली. या पत्राची दखल घेत आयुक्तालयाकडून तातडीने बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने रेल्वेपरिसर तपासण्यात आला. १७ फेब्रुवारीला रविवारी हे पथक देवळाली रेल्वे स्थानकात दुपारी दाखल झाले. पथकाकडून श्वानांमार्फत संपुर्ण परिसर तपासण्यात आला. तर पोलिसांच्या १० जणांच्या टीमने रेल्वे स्थानकावरील कचराकुंड्या, अडगळीच्या जागा धातुशोधक यंत्राद्वारे तपासले. सुमारे तासाभरापेक्षा अधिक वेळ रेल्वे स्थानकाची तपासणी पथकाने केली. मात्र, कोठेही कुठल्याही प्रकारची आक्षेपार्ह वस्तू आढळून आली नसल्याचा खुलासा सुत्रांकडून करण्यात आला आहे. तसेच आयुक्तालयाकडून रेल्वे सुरक्षा पोलिसांनाही याबाबत सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.