नाशिक - आतापर्यंत 7 हजार 443 परप्रांतीयांना सहा ट्रेनच्या माध्यमातून तर 33 हजार नागरिकांना नाशिक येथून बसने गावी पाठवले आहे. मात्र, अजूनही नाशिकमधून हजारो परप्रांतीय नागरिकांनी गावी जाण्यासाठी प्रशासनाला विनंती केली आहे. सर्वाधिक परप्रांतीय मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आहेत.
नाशिकमधून प्रशासनाने 41 हजार परप्रांतीयांना रेल्वेसह बसने गावी पाठवले कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनला दोन महिने उलटून गेले असले तरी परप्रांतीय नागरिकांची गावी जाण्याची धडपड सुरू आहे. लॉकडाऊन जाहीर होताच काही दिवसानंतर हाताला काम नसल्याने आणि कोरोनाच्या भीतीने अनेक परप्रांतीय नागरिकांनी मिळेल त्या वाहनाने तर काहींना पायीच घराचा रस्ता धरला होता. अशात राज्य सरकारने पायी जाणाऱ्या नागरिकांना ताब्यात घेत त्यांची शेल्टर कॅम्पमध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली.
एक महिन्याहून अधिक काळ नाशिकच्या वेगवेगळ्या शेल्टर कॅम्पमध्ये 1 हजार 400 हून अधिक परप्रांतीय मजूर कामगार राहत होते. मात्र, लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यानंतर केंद्र सरकारने नाशिकहून आतापर्यंत 6 विशेष श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून 7 हजार 443 परप्रांतीय मजुरांना मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार येथे पाठवण्यात आले आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा मुंबईहून नाशिक मार्गाने मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशात, बिहार आदी राज्यात जाण्यासाठी परप्रांतीय नागरिकांची पायपीट सुरू होती. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातुन एसटी बसेच्या माध्यमातून सर्वधिक 33 हजार 483 प्रवाशांना त्यांच्या गावांना सोडण्यात आले.
सर्वाधिक प्रवाशी राजस्थान, केरळ, आंध्रप्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यातील आहे. मात्र, आजही श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून आम्हाला आमच्या गावाला सोडावे यासाठी नाशिक पोलिसांकडे 2 हजारहून अधिक परप्रांतीय नागरिकांनी नोंद केली आहे. अर्ज करणाऱ्या नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या नागरिकांची संख्या अधिक आहे.
नाशिक शहरात 14 मे ते 20 मेपर्यंत परराज्यात जाण्यासाठी मजूर, विद्यार्थी आणि इतर नागरिकांनी पोलिसांना अर्ज केला आहे.
उत्तर प्रदेश 1042
मध्यप्रदेश -67
आसाम-10
पश्चिम बंगाल- 207
बिहार- 860
राजस्थान -10
छत्तीसगड -10
गुजरात -2
ओडिशा-87
उत्तराखंड-14
त्रिपुरा-9
दिल्ली-3
हिमालच प्रदेश-1
झारखंड-92
हरियाणा -1
कोलकाता-2
केरळ -1
एकूण 2437