नांदगाव (नाशिक)- अतिवृष्टीमुळे किंवा इतर नैसर्गिक आपत्तीने शेतीचे नुकसान होऊनही कोणत्याही प्रकारे परतावा विमाकंपनीने दिला नसून एकट्या नांदगांव तालुक्यातील तब्बल 24 हजार शेतकरी पिकविम्याच्या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत. 20 टक्के शेतकऱ्यांनाच पीक विम्याचा लाभ मिळाला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकसान झालेल्या सर्वच ठिकाणी पंचनामे करुनही विमा कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. विमा अधिकारी पैसे घेऊन पीकविमा देत असल्याचा गंभीर आरोपही शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
नांदगांव तालुक्यातील तब्बल 30 हजार शेतकऱ्यांनी पीकविमा काढला होता. मात्र, केवळ 6 हजार शेतकऱ्यांनाच पिकविम्याची रक्कम मिळाली असल्याने उर्वरीत शेतकऱ्यांना कधी मदत मिळेल, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सर्वात महत्त्वाचे काही गावात पैसे घेऊन किंवा स्थानिक पुढाऱ्यांनी सांगितलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्यात आले असल्याचा आरोपही शेतकरी करत आहे. याकडे कृषिमंत्री दादा भुसे यांनी लक्ष द्यावे व बळीराजाला वाचवावे, अशी मागणी शेतकरी व किसान सभेच्या वतीने करण्यात येत आहे