महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Graduate Constituency Election : पदवीधर मतदारसंघ निवडणूक; अशी आहे मत नोंदवण्याची प्रक्रिया

विधान परिषद नाशिक पदवीधर मतदार संघासाठी 30 जानेवारी,2023 रोजी मतदान होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. तसेच नाशिक विभागातील एकूण ३३८ मतदान केंद्रे असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या निवडणुकीचे मतदान मतपत्रिकेवर होणार असून हे मतदान कसे नोंदवावे, याची प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे.

Nashik Graduate Constituency Election
विधान परिषद नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूक

By

Published : Jan 20, 2023, 9:43 PM IST

नाशिक : विधानपरिषदेच्या नाशिक शिक्षक पदवीधर मतदार संघासाठी 30 जानेवारी 2023 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांकडून प्रचाराला सुरूवात झाली आहे.दरम्यान, या निवडणूकीत मतदारांना आपला हक्क मतपत्रिकेवरद्वारे बजावता येणार आहे. यामुळे त्या निवडणूकीची मतदान प्रक्रिया प्रक्रिया खालीलप्रमाणे असणार आहे.


मतदारसंघातील पदवीधर मतदारांची संख्या : सहायक निवडणूक निर्णय अधिकारी नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ तथा उपायुक्त रमेश काळे यांनी मतदारांबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून नाशिक विभागात एकूण २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत. तसेच विभागात सर्वाधिक मतदार अहमदनगर जिल्ह्यात आहेत. अहमदनगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यत ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२, नंदूरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ इतके मतदार आहेत.

विभागातील एकूण मतदान केंद्रे : राज्य निवडणूक आयोगाकडून नाशिक विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. तर विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.

अशी आहे मत नोंदवण्याची प्रक्रिया :
➡️ मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केचपेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नका.

➡️ आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात ‘१’ हा अंक लिहून मत नोंदवा.

➡️ एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी ‘१’ हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा.

➡️ निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक आपणांस उपलब्ध आहेत.

➡️ उरलेल्या उमेदवारांकरिता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे २, ३, ४ इ. नोंदवावेत.

➡️ कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका.

➡️ पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की— १, २, ३, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका.

➡️ अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये , जसे की— 1, 2, 3, इ. किंवा रोमन लिपीमध्ये , जसे की— I, II, III, इ. किंवा भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेच्या लिपीमध्ये पसंतीक्रमांक नोंदविता येतील.

➡️ मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका.

➡️ तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी ‘✔️’ किंवा ‘✖️’ अशा खुणा करू नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील.

➡️ तुमची मतपत्रिका वैध ठरण्याकरिता तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे ‘१’ हा अंक नमूद करून नोंदविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details