नाशिक - गांधीनगर येथील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशनचा दीक्षांत सोहळा आज लष्करी थाटात संपन्न झाला. यावेळी युद्धभूमीवर लढाऊ हॅलिकॉप्टर चालविणाऱ्या वैमानिकांनी विविध लष्करी प्रात्यक्षिके सादर केली.
नाशकात आर्मी एव्हिएशनच्या ३१ व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा आज गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात पार पडला.
कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलची पासिंग आऊट परेड आणि विंग प्रदान सोहळा आज गांधीनगरच्या तळावर लष्करी थाटात पार पडला. यावेळी ३१ व्या तुकडीतील प्रशिक्षित ३४ प्रशिक्षणार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच आर्मी एव्हिएशनचे डायरेक्टर जनरल रणवीर सिंग सलारिया यांच्या हस्ते उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रशिक्षणार्थींना पारितोषिक देण्यात आले. कॅप्टन अंकित मलिक आणि मेजर प्रभाप्रीत सिंग यांना मानाची सिल्वर चिता ट्रॉफी प्रदान करण्यात आली.
संचलनानंतर युद्धजन्य परिस्थितीचा थरार उपस्थित नागरिकांनी अनुभवला. तसेच वैमानिकांनी श्वास रोखून धरणारी प्रात्यक्षिके सादर केली. चित्ता, ध्रुव, चेतक या हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने युद्धभूमीवर जवान जे अतुलनीय कार्य करतात त्याची प्रचिती उपस्थितांना अनुभवता आली. शत्रूवर हल्ला करणे, शत्रूचे तळ उद्ध्वस्त करणे, जखमी सैनिकांचा बचाव करणे, अशी सर्व अंगावर रोमांच आणणारी प्रात्यक्षिके यावेळी सादर करण्यात आली.