नाशिक- कोरोना प्रादुर्भावामुळे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात युनानी डॉक्टरांनी खऱ्या अर्थाने कोरोना योद्ध्याची भूमिका बजावली आहे. संकट काळात प्रशासनासोबत उभे राहून मन्सुरा कॅम्पसमधील पथकाने चांगला आदर्श घालून दिल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढले आहे.
कोरोना योद्ध्यांचे सत्कार करण्यासाठी मालेगावातील मन्सुरा कॅम्पसमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सत्तार यांनी हे विधान केले. कोरानाचा मुकाबला करण्यासाठी जवळपास ४०० युनानी डॉक्टरांच्या पथकाने प्रशासनासोबत काम करून मालेगावातील कोरोना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. अहोरात्र मेहनत घेवून इतिहासातील सर्वात मोठ्या सामाजिक संकटाला परतवून मालेगाव पॅटर्न निर्माण करण्यात प्रशासनासह युनानी डॉक्टरांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर, मालेगाव काढ्याने देखील रुग्णांना दिलासा देवून रुग्णांचे मानसिक स्थैर्य अबाधित राखण्यात मोठा हातभार लावला आहे. असे क्रांतीकारी काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार करताना मनस्वी आनंद होत असल्याचे सत्तार म्हणाले.