सटाणा (नाशिक) - जयवंत खैरनार आदिवासी विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठीचा शिधा काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना बागलाण तालुक्यातील मानूर येथील शासकीय आश्रमशाळेच्या अधीक्षकास ग्रामस्थांनी रंगेहाथ पकडले. दरम्यान, बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांनी लगेच मानूर आश्रमशाळेला भेट देऊन ग्रामस्थांनी पकडलेल्या धान्य व खाद्य तेलाचा पंचनामा केला. तसेच याबाबतचा अहवाल मुख्याध्यापकांनी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी पंकज आशिया तसेच तहसील कार्यालयाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शासकीय आश्रमशाळेतील धान्य चोर अधीक्षकाला ग्रामस्थांनी पकडले रंगेहाथ बागलाणच्या पश्चिम भागातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळा निकृष्ट दर्जाचे जेवण, शासनाने ठरवून दिलेल्या आहारानुसार न दिले जाणारे भोजन अशा कारणांनी नेहमीच वादग्रस्त आहेत. अशातच मानूर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या अन्नधान्याच्या साठ्याची अनेक दिवसांपासून काळ्या बाजारात विल्हेवाट लावली जात असल्याची कुणकूण ग्रामस्थांना लागली होती. रात्री साडेअकराच्या सुमारास ग्रामस्थ शाळेजवळ दबा धरून बसले असता शाळेचे अधीक्षक सांगेवार हे स्वत: गहू, तांदूळ, डाळ, जिरे, मोहरी, मठ, हरभरा आणि तेलाचा डबा घेऊन त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी गावाबाहेर जात असताना रंगेहाथ पकडले गेले.
संतप्त नागरिकांनी गराडा घालून अन्य ठिकाणी साठवलेला अन्नधान्य साठा कुठे आहे, अशी विचारणा केली. हा प्रकार पाहून अधीक्षकाने तेथून पळ काढला. ग्रामस्थांनी मध्यरात्रीच्या सुमारास तहसीलदार इंगळे पाटील यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. यावेळी इंगळे पाटील यांनी पंचायत समिती सदस्य पंडित अहिरे, पंढरीनाथ गांगुर्डे, उत्तम बहिरम, आत्माराम बहिरम, रंगनाथ गांगुर्डे, नीलेश गांगुर्डे यांना साठा जप्त करण्याच्या सूचना दिल्या. तहसीलदार इंगळे पाटील, एस.जी. भामरे यांनी आश्रमशाळेला भेट देऊन अधीक्षकाने चोरलेल्या अन्नधान्याच्या गोठींचा पंचनामा करण्यात आला. यावेळी भांडार गृहामधील सर्व साठ्याची तपासणी करण्यात आली.
दुधाच्या साठ्यात तफावत
शासनामार्फत विद्यार्थ्यांना दूध पुरवठादेखील सुरू आहे. तहसीलदार यांच्यासमोर शालेय व्यवस्थापनाला मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळून आली व दुधाच्या पिशव्यांचा साठा विचारला असता त्यांनी दोन हजार पिशव्या शिल्लक असल्याची माहिती दिली, मात्र प्रत्यक्षात २८०० पिशव्या आढळून आल्याने यंत्रणा अधिकच संशयाच्या भोवऱ्यात सापडली. लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने अनेक आदिवासी बांधवांवर उपासमारी वेळ आली असताना बालकांच्या तोंडातून घास हिरावण्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.