दिंडोरी (नाशिक) -कोरोनामुळे राज्यात सर्व धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. श्री सप्तश्रृंगी भगवती मंदिरदेखील भाविकांना दर्शनासाठी पूर्णत: बंद करण्यात आले आहे. परंतु कीर्ती ध्वजाची परंपरा कायम राहली असून अत्यंत साधेपणाने हा सोहळा पार पडला.
देवी संस्थानचे विश्वस्त अॅड. ललित निकम, बी. ए. कापसे, तहसीलदार, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांच्या हस्ते या ध्वजाची विधीवत पूजा करण्यात आली. या ध्वजासाठी १० फूट लांब काठी, ११ मीटर केशरी कापडाचा ध्वज, पूजेसाठी गहू, तांदूळ, कुंकू, हळद तसेच झेंडा घेऊन मध्यरात्री १२ वाजता गवळी परिवार शिखरावर जातो. मात्र राज्यातील कोरोनाचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाच्या आदेशाप्रमाणे अत्यंत साधेपणाने सायंकाळी ६;३० वाजता देवी भगवतीच्या मंदिरात पोहचून गवळी परिवार देवीसमोर नतमस्तक होऊन पुढील मार्गासाठी मार्गस्थ झाले.