नाशिक -जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मात्र, असे असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८४ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. नाशिकमधील कोरोनाबाधितांची संख्या २५ हजारांपेक्षा जास्त झाली आहे. यातील ७१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिकमध्ये चाचण्या वाढवल्याने रुग्णसंख्या वाढत आहे सध्या शहरात अँटीजेन टेस्ट मोठ्या प्रमाणात केल्या जात असल्यामुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्यामुळे आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत आहे. आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना नागरिकांनीही चांगली साथ दिली, तर आपण कोरोना नक्कीच आटोक्यात आणू, असे महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी म्हटले आहे.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी -
नाशिक ग्रामीणमध्ये रुग्ण बरे होण्याची टक्केवारी ७४.८२ टक्के, नाशिक शहरात ८४.१९ टक्के, मालेगावमध्ये ६५.६४ टक्के इतकी आहे. जिल्हाबाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८४.३८ टक्के आहे तर, जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.४६ इतके आहे. आतापर्यंत नाशिक ग्रामीणमध्ये १९०, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४०५, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ९७ व जिल्हा बाहेरील २१ अशा एकूण ७१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
२५ हजार ९१० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २० हजार ८४६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात ४ हजार ३५१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.