नाशिक -डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणाच्या चौकशी अहवालात महानगरपालिकेचा सदोष करारनामा व ठेकेदाराचा हलगर्जीपणा कारणीभूत असल्याचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीचे म्हणणे आहे.
ठेकेदार अन् महापालिकेच्या काही चुका
21 एप्रिलला दुपारी 12 वाजून 13 मिनीटांनी नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्याने ऑक्सिजन पुरवठा बंद झाला आणि त्यामुळे 24 रुग्णांचा मृत्यू झाला होता. या गंभीर घटनेसाठी उच्च स्तरीय चौकशी समिती नेमली होती. यादरम्यान अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ऑक्सिजन सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी ठेकेदाराचे तंत्रज्ञ उपस्थित ठेवण्याची अट महानगरपालिकाने टाकली नव्हती. काही तक्रार असल्यास 24 तासांमध्ये त्याचे निराकरण करावे, अशी ठेकेदाराला सोयीची अट टाकली गेल्याचे समोर आले आहे. त्यामुळे दुर्घटनेनंतर तिला तत्काळ आटोक्यात आणणारी यंत्रणा या ठिकाणी नव्हती. त्यामुळे स्थानिक पर्यायी व्यवस्था करावी लागली असेही चौकशीत पुढे आल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे 24 तासांत तक्रारीचे निराकरण तर सोडाच पण ठेकेदाराचे तंत्रज्ञ घटनेच्या तब्बल 72 तासानंतर आल्यामुळे ठेकेदाराचा हलगर्जीपणा देखील अधोरेखित झाला आहे. दरम्यान, 15 दिवसांची मुदत असतानाही यापूर्वीच हा चौकशी अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे.