नाशिक - बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथे सात महिन्यांच्या गरोदर असलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पीडितेच्या मामाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पित्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना काल (मंगळवार) समोर आली.
दरम्यान, ही हत्या की आत्महत्या याची उकल अद्याप झाली नसली, तरी मृत पीडितेच्या मामाने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित पित्याला सटाणा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तळवाडे दिगर येथील एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह सोमवारी (दि. 25 नोव्हें) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राहत्या घरामागे मोकळ्या जागी जळालेल्या अवस्थेत आढळून आला. ती 80 टक्के भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली.
घटनेची माहिती मिळताच मालेगाव ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक नंदलाल गायकवाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर तिचा मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला. पीडितेच्या मामाने दिलेल्या तक्रारीनुसार सटाणा पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे.