नांदगाव (नाशिक)- नांदगावच्या ग्रामीण भागात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. बोलठाणसह इतर काही गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. या पावसामुळे नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. या पुरात बैलगाडी वाहून गेल्यामुळे 2 बैलांचा मृत्यू झाला, तर शेतकऱ्याला वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले आहे.
2 बैलांचा दुर्दैवी मृत्यू
जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बोलठाणला काल (बुधवारी) सायंकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. या पावसाने नदी, नाले एक होऊन वाहत होते तर अनेक ठिकाणी पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. या पावसात शरद बापू चव्हाण यांची बैलगाडी वाहून गेली. यात 2 बैलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, मात्र चव्हाण यांना वाचवण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. बोलठाणसह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे जातेगाव व बोलठाणला जोडणारा पुलावरून पाणी वाहत असल्याने या दोन्ही गावाशी संपर्क तुटला होता.