नाशिक -शाळाप्रवेशापासून निकालापर्यंतच्या प्रक्रियेतून शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय शिक्षक दिनी शिक्षकांना पुरस्कार देण्याची प्रथा बंद करून शिक्षकांचीही उपेक्षा केली आहे. सलग दोन वर्षे राज्य शिक्षक पुरस्कार बंद करून शिक्षणाचे काटे उलटे फिरविण्याचा हट्ट मागे घेऊन शिक्षक पुरस्कारांची प्रथा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी भाजपाचे नाशिक महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांनी एका केली आहे.
'शिक्षकांनी केली वारंवार मागणी' -
राज्य शासनातर्फे राज्यातील शिक्षकांना ५ सप्टेंबरला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची प्रथा ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांसाठी राज्यातील शिक्षकांकडून आवेदनपत्रे मागवून राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांचे वितरण सोहळे पार पाडणाऱ्या ठाकरे सरकारला राज्याचे पुरस्कार बंद करताना खंत वाटली नाही, असा आरोपही गिरीश पालवे यांनी केला. राष्ट्रीय पातळीवर राज्यातील शिक्षकांचा सन्मान होत असताना, शालेय शिक्षणात महत्वाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कारापासून वंचित ठेवून राज्य सरकारने आपले शिक्षणविरोधी धोरण उघड केले आहे, असे ते म्हणाले. गेल्या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले गेले नाहीत, या वर्षी त्यासंबंधीचे कोणतेही परिपत्रकदेखील जारी केले नाही. शिक्षकांनी वारंवार मागणी करूनही सरकारतर्फे निवड समिती किंवा निवड प्रक्रियाही जाहीर करण्यात आली नाही. गेल्या वर्षी पुरस्कारांची निवड न केल्याने जे आदर्श शिक्षक पुरस्कार व त्यापासूनच्या लाभापासून वंचित राहिले, त्यांची निवड करावी व यंदाचे पुरस्कार तातडीने जाहीर करून शिक्षण क्षेत्राचा अपमान थांबवावा, अशी मागणीही पालवे यांनी यावेळी केली आहे.