नाशिक- विल्होळी गावातील भाईने ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिच्चून संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे या भाईच्या वाढदिवसाला नाशिक तालुका पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार असलेला संशयित आरोपी देखील उपस्थित असल्याचे व्हिडिओतून दिसून येते. त्यामुळे आता सामान्यांना दंडुके दाखवणारे पोलीस गावगुंडाबाबत बोटचेपी भूमिका का घेतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
संचारबंदीत भाईचा बड्डे; नियम धाब्यावर बसवून भरचौकात जल्लोष, रेकॉर्डवरील फरार आरोपीची हजेरी - विल्होळी
पोलिसांच्या नाकावर टिच्चून संचारबंदीचे निमय धाब्यावर बसवत भाईचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी दंगलीतील आरोपीही उपस्थित होता, मात्र पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे.
विल्होळी गावात एका भाईने संचारबंदीत कार्यकर्त्यांसमवेत वाढदिवस साजरा केला आहे. संचारबंदी काळात घालून देण्यात आलेले सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम धाब्यावर बसवत वाढदिवस साजरा करणाऱ्या या भाईचे संजय गायकवाड असे नाव असून या गल्लीतील त्याने वाढदिवसाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओमध्ये मागील 15 दिवसांपूर्वी या गावात 2 गटात झालेल्या दंगलीतील पोलिसांच्या रेकोर्डवर फरार असलेला संशयित आरोपी दिनेश गायकवाड देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे.
एकीकडे संचारबंदीत घराबाहेर पडणाऱ्या सामान्य नागरिकांवर पोलीस दंडूके चालवत गुन्हे दाखल करतात. मात्र दुसरीकडे संचारबंदीचे नियम धाब्यावर बसवत भर चौकात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना एकत्र जमून वाढदिवस साजरा करणाऱ्या गावगुंडावर पोलीस कारवाई नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच संशय उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे अशा गाव गुंडांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना तक्रारीची गरज नाही. पोलीस अशा निमय मोडणाऱ्या लोकांवर सुमोटो कारवाई करू शकतात. मात्र या घटनेत पोलिसांनी या लोकांना अटक तर सोडा, साधी चौकीशी देखील केली नाही. त्यामुळे पोलीसांचीच भूमिका संशयाच्या भोवऱ्यांत सापडली आहे.