नाशिकTall Buildings Not allowed In Nashik : आग विझवण्यासाठीची शिडी पुरवठादार कंपनी दिवाळखोरीत निघाल्यामुळे 90 मीटर उंचीपर्यंतची आग ( Tallest Building ) विझवण्यासाठी उपयुक्त शिडी खरेदी खरेदी करता येत नाही. तसं पत्र महानगरपालिकेच्या अग्निशमक विभागाने दिलंय. नगररचना विभागाने थेट नवीन शिडी खरेदी करेपर्यंत 70 मीटर उंची पुढील इमारतींना बांधकाम परवानगीच न देण्याचा फतवा काढला आहे. यामुळे बांधकाम व्यवसायिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
120 मीटर उंचीच्या इमारतींना परवानगी नाही :(Nashik News) नाशिक महानगरपालिकेच्या नगररचना विभागाने 90 मीटर उंचीपर्यंतची आग विझवण्यासाठी उपयुक्त शिडी नसल्याने, शिडी खरेदी करेपर्यंत 70 मीटर पुढील इमारतींना बांधकामाला परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यापूर्वी 30 मीटर उंचीची अग्नी प्रतिबंधित शिडी असताना 120 मीटर उंचीच्या इमारतींना बांधकाम परवानगी दिली होती. आता अचानक नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या अजब पवित्र्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. याबाबत आयुक्त अशोक करंजकर यांना अंधारात ठेवून निर्णय घेतल्यामुळे प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे.
शिडी नाही म्हणून परवानगी नाही: मुंबई, पुण्यानंतर नाशिकच्या रियल इस्टेट क्षेत्राला पसंती वाढली आहे. नाशिकचं वातावरण चांगलं असल्यानं, घर खरेदीचा कल वाढत आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील बांधकाम व्यवसायकांनी मोठ-मोठे प्रकल्प साकारण्यात सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत गोविंद नगर भागात 120 मीटर उंचीची इमारत साकारली जात आहे. हाय राईज इमारतींना चांगली पसंती मिळत आहे. अशा बिल्डिंगमध्ये अग्निशमन व्यवस्था कार्यान्वित करण्याचे नियम कठोर आहेत. तसंच या नियमांचं पालन केल्याची खात्री झाल्याशिवाय नगररचना विभाग बांधकाम पूर्णत्वाचा दाखलाही देत नाही. असं असताना नगररचना विभागाने अग्निशामक विभागाच्या एका पत्राच्या अनुषंगाने घेतलेल्या निर्णयामुळे बांधकाम व्यवसायिकांमधून संताप व्यक्त होत आहे. आता 70 मीटर उंची पुढील इमारतींना बांधकाम परवानगी देऊ नये असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता नव्याने होणाऱ्या हायराईज इमारतींचं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.