महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशिकमध्ये दाखल - नाशिक रणगाडा बातमी

पाकिस्तानला युद्धात धूळ चारणारा आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यातील टी-55 हा रणगाडा नाशिकमध्ये दाखल झाला आहे.

t55-tank-in-1971-war-arrives-in-nashik
पाकिस्तानला धूळ चारणारा रणगाडा नाशिकमध्ये दाखल

By

Published : Oct 23, 2020, 7:05 PM IST

नाशिक-पाकिस्तानला युद्धात धूळ चारणारा आणि भारतीय लष्कराच्या ताफ्यातील टी-55 हा रणगाडा नाशिकमध्ये दाखल झाला आहे. हा रणगाडा नाशिकमध्ये यावा यासाठी नगरसेवक प्रविण तिदमे हे दीड वर्षांपासून प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे.

नाशिकमधील नागरिकांना भारतीय सैन्य दलाच्या पराक्रमाची, शौर्याची महती कळावी आणि तरुणांना सैन्यदलात भरती होण्याची प्रेरणा मिळावी, यासाठी नाशिकमध्ये सैन्यदलाची वॉर ट्रॉफी असावी, अशी संकल्पना नगरसेवक प्रविण तिदमे यांनी मांडली होती. तत्कालीन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी या प्रस्तावाला मान्यता दिल्याने लष्कराने टी-५५ हा रशियन बनावटीचा रणगाडा नाशिक महापालिकेला देण्यास मंजुरी दिली आहे. हा रणगाडा नाशिकमध्ये आणण्यासाठी गेल्या दीड वर्षांपासून नगरसेवक प्रविण तिदमे व नाशिकमधील सेवाभावी संस्था प्रयत्नशील होती. अलीकडेच त्यांनी महासभेतच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने हालचाली गतिमान केल्या आणि पुणे येथून हा रणगाडा नाशिक महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. या रणगाड्याचे वजन 40 टन असून जुने सिडकोतील लेखानगर येथे हा रणगाडा ठेवण्यात येणार आहे. मात्र, येथील काम पूर्ण झालेले नसल्याने हा रणगाडा सध्या जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज भाजी मार्केटच्या मागील क्रीडांगणात उतरविण्यात आला आहे. टी-55 या रणगाड्याने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचे ५८ रणगाडे नष्ट केले होते. सन १९६० ते १९८० या काळात सीमेवर या रणगाड्यांनी पाकिस्तानी सैन्यादलात दहशत निर्माण केली होती. भारतीय सैन्यदलात या रणगाड्यांनी ४० वर्षे सेवा दिली आहे आणि आता हा रणगाडा नाशिकच्या लौकिकात भर घालणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details