नाशिक Sushma Andhare On BJP : भाजपा आमदार नितेश राणे यांनी 15 डिसेंबर रोजी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील सूत्रधारासोबतचे सुधाकर बडगुजर यांचे फोटो, तसंच व्हिडिओ असल्याचं त्यांनी विधिमंडळात दाखवलं होतं. तसंच राणे यांनी सुधाकर बडगुजरसह ठाकरे गटावर गंभीर आरोप करत कारवाईची मागणी केली. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपाबाबत मोठं वक्तव्य केलंय. दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्नात भाजपाचे मंत्री गिरीश महाजन गेल्याचे फोटो व्हायरल करून अंधारे यांनी भाजपाला लक्ष्य केलंय. त्यामुळं नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सुषमा अंधारेंनी केला व्हिडिओ शेअर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा उजवा हात मानला जाणारा सलीम कुत्ताशी ठाकरे गटाचे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत केला होता. यावेळी त्यांनी एका पार्टीत बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ दाखवला होता. त्यानंतर बडगुजर यांनी पत्रकार परिषद घेत आमदार राणे यांचे आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार करत भाजपा नेते गिरीश महाजन, देवयानी फरांदे देखील दाऊद इब्राहिमच्या नातेवाईकाच्या लग्न समारंभात उपस्थित असल्याचा आरोप केला. तसंच सुषमा अंधारे यांनी त्यांचे फोटोही जारी केले आहेत.