नाशिक - पेठ तालुक्यातील बालगृह अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणी वसतीगृहाच्या अधीक्षक आणि तिच्या आरोपी मुलास नाशिक न्यायालयाने 10 वर्षांची सक्तमजुरी सुनावली आहे. सन 2015 मध्ये आदिवासी महिला संरक्षण अनाथ मुलींच्या वसतीगृहातील मुली दिवाळीसाठी नातेवाईकांकडे गेल्या होत्या. यावेळी अधीक्षक सुशीला अलबाड यांच्या मुलाने एका अल्पवयीन मुलीला कार्यालयात बोलावून तिच्यावर बलात्कार केला होता. अतुल अलबाड असे आरोपीचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने अधीक्षक महिलेला माहिती दिल्यानंतर तिला मारहाण करण्यात आली होती. तसेच पीडितेलाच खोटं ठरवण्यात आलं. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने या प्रकरणाची कोणाकडेही वाच्यता केली नाही.यानंतर संशयिताने वारंवार या मुलीवर अत्याचार केले होते.
2017 मध्ये मुलगी सज्ञान झाल्यानंतर तिला नाशिकच्या शासकीय महिलांच्या अनुरक्षकगृहात वर्ग करण्यात आले. यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने अधीक्षक सारीका गांगुर्डे यांना आपबिती सांगितली. यानंतर आधीक्षक गांगुर्डे यांनी मुलीला घेऊन मुंबई नाका पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत हे प्रकरण पेठ पोलीस ठाण्यास वर्ग केले.
तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षण कमलाकर यांनी संबंधित प्रकरणाचा तपास केला. या नंतर हा खटला जिल्हा न्यायाधीश संध्या नायर यांच्या कोर्टात चालला. न्यायालयाने पीडित मुलीची साक्ष आणि आठ साक्षीदार तपासून आरोपी अतुल अलबाड आणि अधीक्षक सुशीला अलबाड यांना प्रत्येकी 20 हजार रुपये दंड आणि 10 वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी सरकारी वकील दिपशिखा भिडे यांनी काम पाहिले.