येवला (नाशिक) : Suffering Of Tomato Farmer : कधी अवकाळी पाऊस तर कधी दुष्काळ अशा अनेक संकटांवर मात करत येवला तालुक्यातील मुखेड फाटा जऊळके येथील सचिन दाते या शेतकऱ्याने आपल्या पत्नीचे सोने गहाण ठेवत टोमॅटो पिकवले. मात्र, अक्षरश: टोमॅटोला 40 ते 45 रुपये कॅरेट असा कवडीमोल भाव मिळू लागल्याने केलेला उत्पादन खर्च देखील निघणे कठीण झाले. अशात आपली जनावरं तरी पोट भरतील याकरिता त्यांनी उभ्या टोमॅटोच्या पिकात जनावरे चरण्यास सोडून दिली. आता गहाण ठेवलेले सोने कसे सोडवावे, असा मोठा प्रश्न या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याला पडला आहे.
मंत्र्यांचे दुर्लक्ष, शेतकऱ्याचा आरोप:सचिन दाते या शेतकऱ्याने आपल्या तीस गुंठ्यामध्ये टोमॅटो पीक घेतलं होतं. भाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी व त्याच्या पत्नीनं पिकाला मुलासारखं पिक पिकवलं; मात्र बाजारात विक्री करण्याची वेळ आली त्यावेळेस अक्षरश: ४० रुपये कॅरेट भाव मिळू लागला. शेतकऱ्याला वाहतूकीसह तोडणीकरिता ६० रुपये येऊ लागले. हातात काही शिल्लक राहत नसल्याने अक्षरशः उभ्या टोमॅटोच्या पीकावर शेतकऱ्यांनी शेतात जनावरे सोडून दिली आहेत. तरी मुखेड फाटा नाशिक-संभाजीनगर महामार्गालगत असल्याने येथून अनेक खासदार, आमदार तसेच मंत्री ये जा करतात; मात्र या मंत्र्यांना आमचा लाल चिखल दिसत नसल्याचा आरोप या तरुण टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांनी केला आहे. आता सरकारने लक्ष देऊन कांद्याप्रमाणे टोमॅटोला देखील अनुदान द्यावे अशी मागणी टोमॅटो उत्पादकांकडून होताना दिसत आहे.