नाशिक- कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. खबरदारी म्हणून नागरिक घरात बसून आहेत. मात्र, जीव धोक्यात घालून या संकटकाळात वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस यंत्रणा कर्तव्य बजावत आहे. या कर्मचाऱ्यांचे आभार मानण्यासाठी नाशिक येथील शिक्षिका दर्शना राजपूत यांनी 'थँक्यू ग्रीटिंग्ज' पाठवले आहेत. या उपक्रमाचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कौतुक केले आहे.
गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळापासून कोरोनाचे सावट आहे. सीमेवरील जवान मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असतात. अगदी त्याचप्रकारे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीही कर्तव्य पार पाडत आहेत. या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी नाशिकच्या दर्शना राजपूत यांनी आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे. दर्शना राजपूत यांनी नाशिकसह देशातील कोरोना योद्ध्यांना हजारो ग्रीटिंग कार्ड पाठवून कृतज्ञता व्यक्त केली आहे. स्केच पेंट एक्सप्रेस फॉर इंडिया या राष्ट्रीय संस्थेच्या सदस्य असलेल्या दर्शना राजपूत या नाशिकमधील एका शाळेतील शिक्षिका आहेत. काही महिन्यांपूर्वी भारतीय सैन्य दलाचे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी त्यांचा गौरव देखील केला होता.