मनमाड (नाशिक) Strike of Onion Traders : नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कुठलाही तोडगा निघाला नाही. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सर्व १५ बाजार समिती व उपबाजार समितीत व्यापाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय. या बंदाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात शेतमालाला नसलेला भाव यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा नवीन संकट येऊन ठेपलंय. ( Market Committees in Nashik Closed )
जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत तोडगा नाही :कांद्याच्या निर्यातीवर लावण्यात आलेले 40 टक्के निर्यातशुल्क यासह इतर मागण्यांसाठी कांदा व्यापाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून आंदोलन केलं होतं. तसंच बाजार समित्यांनी लाक्षणिक बंदही पुकारला होता. त्यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी मध्यस्थी केल्यानं आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही व्यापाऱ्यांच्या मागण्या प्रलंबित राहिल्या होत्या. यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक झाली, त्यातही तोडगा न निघाल्याने आज अखेर जिल्ह्यातील सर्व 15 बाजार समित्या तसंच उपबाजार समितीतील व्यापाऱ्यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय. याचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. आधीच दुष्काळी परिस्थिती असून त्यात कांद्यासह शेतमालाचा कमी झालेला भाव यातून कसा मार्ग काढावा यामुळं शेतकरी संकटात सापडला असताना आता बाजार समिती बंद असल्याने बळीराजा हतबल झालाय. ( Farmers hit by indefinite strike of onion traders )