नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पहिल्या दिवशी रात्री 11 वाजेपासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच 13 पोलीस ठाण्यांमधील विविध ठिकाणी बॅरिकेडद्वारे कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.
पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन -
नाशिकमध्ये गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे नियम अधिक कडक करण्यात आले आहे. मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच विनामास्क आढळून आलेल्या व्यक्तींना 1 हजार रुपयांपर्यंत दंड करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवा किंवा जीवनावश्यक वस्तु वगळता इतर नागरिकांना शहरात वावरण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. संचारबंदीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख नियोजन करण्यात आले आहे.
काय आहेत नियम -
- प्रत्येकाला नागरिकाला मास्कचा वापर सक्तीचा
- सार्वजनिक ठिकाणी 5 किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी
- सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, गुटखा, तंबाखू सेवन करण्यास किंवा थुंकण्यास बंदी
- मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स, स्वच्छता आदी नियमांचे पालन करण्याचे आदेश
- नियम मोडणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई
हेही वाचा - पाच सत्रात शेअर बाजार निर्देशांकात २,४१० अंशांची घसरण; ही आहेत चार कारणे