नाशिक -सर्वोच्चन्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण रद्द केल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. हे आरक्षण वाचवण्यासाठी तसेच ओबीसी जनगणनेसह विविध मागण्या घेऊन केंद्र सरकारच्या विरोधात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद आणि सर्व ओबीसी संघटनांनी गुरुवारी (17 जून) द्वारका चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी शेकडो कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
छगन भुजबळांच्या नेतृत्त्वात आंदोलन
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिरिक्त आरक्षण रद्द केल्याने ओबीसी समाजाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. समता परिषदेने नाशिकच्या द्वारका चौफुली येथे रास्ता रोको करत आंदोलन केले. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण वाचवा यासाठी आक्रोश आंदोलन करण्यात आले. सध्या या आंदोलनासाठी स्वत: छगन भुजबळ हे रस्त्यावर उतरले नसले, तरी त्यांच्याच नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी केंद्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. समता परिषदेचे कार्यकर्ते हातात निषेध फलक घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते. तर काहीजण महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा करून या आंदोलनात सहभागी झाले होते.