नाशिक - शहरातील पेठरोड परिसरात असलेल्या हनुमानवाडी पाटालगत नाशिक महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत अनधिकृत झोपड्यांचे अतिक्रमण काढत असताना झोपडपट्टीतील नागरिकांनी अतिक्रमण विभागाच्या पथकावर जोरदार दगडफेक केली. यामध्ये महानगरपालिकेच्या जेसीबीच्या काचा फोडण्याची घटना घडली. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांची कारवाई होताना अशा घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. सरकारी कामात व्यत्यय आणल्यामुळे मात्र या दगडफेक करणाऱ्या महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Encroachment Squad :अतिक्रमण पथकावर दगडफेक; गोंधळ घालणाऱ्या महिला ताब्यात - undefined
नाशिकमध्येअतिक्रमण पथकावर दगडफेक करण्यात आली आहे. गोंधळ घालणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
![Encroachment Squad :अतिक्रमण पथकावर दगडफेक; गोंधळ घालणाऱ्या महिला ताब्यात अतिक्रमण पथकावर दगडफेक](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/1200-675-18632451-1021-18632451-1685448449390.jpg)
नाशिक महानगरपालिका अतिक्रमण विभागामार्फत आज पंचवटी परिसरात पोलीस बंदोबस्तात अनाधिकृत झोपड्या हटवण्याचे काम सुरू होते. त्याच दरम्यान झोपडपट्टीत राहणाऱ्या काही महिलांनी पोलीस कर्मचारी तसेच नाशिक महानगरपालिकेच्या पथकाशी वाद घालला. तसेच काही युवकांनी थेट जेसीबीच्या समोर येत जेसीबीवर दगडफेक करत काचा फोडल्या. यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या युवकांना तसेच गोंधळ घालणाऱ्या महिलांना ताब्यात घेतले आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचे आरोप त्यांच्यावर आहेत. तसेच दंगल घडवण्याचाही आरोप पोलिसांनी त्यांच्यावर केला आहे.
20 अनधिकृत झोपड्या हटवल्या -पंचवटी परिसरातील 20 झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. वास्तविक यापूर्वीच येथील या रहिवाशांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांना विभागीय अधिकाऱ्यांनी कारवाईसंदर्भातही माहिती दिली होती. त्यानुसार आज सकाळपासून ही कारवाई सुरळीत सुरू होती. काही वेळापूर्वी काही मुलांनी गोंधळ घालून दगडफेक केली. यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र जेसीबीचे मोठे नुकसान झाले. नुकसान करणाऱ्या युवकांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यापुढे अशाप्रकारे कोणी कायदा हातात घेतला तर त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून कडक कारवाई केली जाईल, असे नाशिक मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त करुणा डहाळे यांनी सांगितले. संबंधितांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्यांच्यावर कोर्टामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. पोलिसांच्या मदतीने ही अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली.