नाशिक - तारवालानगर मधील शिवशक्ती संकुल, मातृछाया, वृंदावन अशा चार गृहसंकुलातील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली. चोरी करताना चोरट्यांनी लहान मुलांनी जमा केलेल्या पिगीबँकमधील पैसेही चोरून नेले. घरफोडी करून लूटमार केल्याने नागरिकांनी निष्क्रीय पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
तारवालानगरमध्ये एकाच रात्रीत चार घरांमध्ये चोरी
नाशिक पंचवटी परिसरात नागरिक बाहेरगावी गेल्याचे पाहून एकाच रात्रीत चार सदनिकांचे (फ्लॅट) कुलूप तोडून चोरट्यांनी किमती ऐवज लंपास केला.
मध्यरात्री रात्री तीन वाजण्याच्या सुमारास तारवालानगर परिसरात असणाऱ्या शिवशक्ती संकुल मधील अनिल महादेव सानप, अमर अशोक बोडके, मातृछाया सोसायटी मधील सौरभ शामकांत जोशी तर वृंदावन सोसायटीमधील अभिजित देसाई यांच्या मालकीच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला.
सौरभ शामकांत जोशी यांच्या घरातील 600 रुपये चोरट्यांनी लंपास केले. मात्र, घरातील लॅपटॉप, मोबाईल, दागिने आणि इतर साहित्याला चोरट्यांनी हात लावला नाही. अभिजीत देसाई यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा आवाज शेजारी राहणाऱ्या प्रवीण शिंदे कुटुंबीयांना लागताच त्यांनी पोलिसांना फोन केला. काहीतरी गडबड होत असल्याचे लक्षात येताच या ठिकाणाहून चोरट्यांनी पळ काढला. अमर अशोक बोडके हे गावाला गेले असून त्यांच्या घरातून वीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. तर महादू सानप यांच्या घरातील लहान मुलांच्या पैसे साठवण्याच्या तीन पिगी बँकवर देखील चोरट्यांनी डल्ला मारत 25 ते 30 हजार रुपयांवर हात साफ केला. तसेच घरातील कपाटात ठेवलेली जवळपास 43 हजार रुपयांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली.
याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पंचवटी परिसरात यापूर्वी देखील अनेक घरफोड्या झाल्या आहेत. अद्याप देखील त्यांचा छडा लागलेला नाही. तारवालानगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून घरफोडी आणि वाहन चोरीचे सत्र सुरूच असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यातील एकाही गुन्ह्याचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले नसल्याने नागरिकांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे. त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.