नाशिक- कोरोना विषाणूपासून पोलिसांचा बचाव व्हावा यासाठी जिल्हा पोलीस आयुक्तालयाने पोलीस दलात खास निर्जंतुकीकरण व्हॅनचा समावेश केला आहे. त्यामुळे, कर्तव्य बजावत असताना पोलिसांच्या मनात सुरक्षिततेच्या भावानेसोबत आत्मविश्वास पण वाढणार आहे, असे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात नागरिकांनी घराबाहेर निघू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यात कर्तव्य बजावत असताना पोलिसांना देखील कोरोना विषाणूची लागण झाल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे, नाशिक आयुक्तालयाने पोलीस दलामध्ये निर्जंतुकीकरण व्हॅनचा समावेश केला आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने तयार केलेल्या या वाहनातून पोलिसांवर सौम्य सोडियम हॅपोक्लोराईड, सोप सोल्युशन आणि पाण्याचा शिडकाव केला जातो, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होत आहे.