नाशिक - केंद्र सरकारच्या पाया पडण्यापेक्षा राज्य सरकारने नियोजन करणे गरजेचे होते. तरीदेखील केंद्र सरकार ऑक्सिजनचा आणि रेमडेसिवीरसाठी सरकारला मदत करेल, असे मत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले. नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटल येथे झालेल्या ऑक्सिजन गळती प्रकरणी आठवले यांनी हॉस्पिटलला भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनकडून माहिती घेतली. त्या नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्य सरकारने कोरोनाबाबत नियोजन करणे गरजेचे -
महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा उद्रेक झाला असून ऑक्सिजनची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मी तुमच्या पाया पडतो, पण ऑक्सिजन उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती सरकार कडे केली होती. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपली प्रतिक्रिया देत म्हटले की महाराष्ट्र सरकारने कोरोनाबाबत आधी नियोजन करणे गरजेचे होते. मात्र, तसे त्यात त्यांना अपयश आले असून आता राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पाया पडण्याची गरज नसून केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करत आहे. राज्यातील मंत्र्यांनी विनाकारण केंद्रावर आरोप करण्यापेक्षा राज्यातील रुग्णांना कसा दिलासा देता येईल, हा प्रयत्न करावा, असेही आठवले यांनी म्हटले आहे.