नाशिक -गेल्या तीन महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेतन न मिळाल्याने, कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर आज नाशिकमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी कुटुंबासोबत आक्रोश आंदोलन केले. तसेच थकीत वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील कर्मचारी आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेत. यात अनेक कर्मचारी कोरोनाबाधित झाले, तर अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. मात्र असे असूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने थकीत वेतन लवकरात लवकर द्यावे, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी त्यांनी आज आक्रोश आंदोलन केले. या आक्रोश आंदोलनात कर्मचाऱ्यांसोबत त्यांचे कुटुंबीय देखील सहभागी झाले होते. मुलांनी हातात शाळेतील पुस्तक घेऊन, आमच्या पालकांचे वेतन देण्याची विनंती केली.
वेतन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या