नाशिक - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नाशिकमधील नागरिकांना घरात बसण्याचा सल्ला देणाऱया पोलिसांना मात्र दिवस-रात्र कर्तव्य करावे लागत आहे. नाशिक शहरातील प्रत्येक चौकात नाकाबंदीसाठी थांबावे लागत आहे. त्यांचा रोज शेकडो नागरिकांशी संपर्क येत असून त्यांचा कोरोनापासून बचाव व्हावा यासाठी नाशिक पोलीस आयुक्तलयाने खास कर्मचाऱ्यांसाठी सॅनिटायझर व्हॅन बनवली आहे. यामुळे कर्तव्य बजावताना पोलिसांच्या मनात सुरक्षिततेच्या भावने सोबत आत्मविश्वासही वाढणार असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.
देशातील प्रत्येक नागरिक कोरोना विषाणूपासून दूर रहावा यासाठी देशातील प्रत्येक पोलीस रस्त्यावर उभा आहे. नाशिक शहरात ठिकठिकाणी करण्यात आलेल्या नाकाबंदीच्या ठिकाणी नाशिक पोलीस आपले कर्तव्य बजावत आहे. अशात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हजारो लोकांच्या संपर्कात येत असून वाढलेल्या तापमानात ड्युटी करताना त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांच्या वाहनांचे दररोज निर्जंतुकीकरण केले जात आहे. नव्याने महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीची एक अद्यावत व्हॅन तयार केली आहे. या वाहनातून पोलिसांवर सौम्य सोडियम हाइपोक्लोराइड, सोप सोल्युशन आणि पाण्याचा फवारा मारून सॅनिटाईझ करण्यात येणार आहे.