नाशिक : जी वस्तुस्थिती आहे त्यावर बोलणारा मी कार्यकर्ता आहे. मी काही लेचापेचा नाही. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागे दुसरं बोलायचं अशी व्यक्ती मी नाही. माझी गेल्या तीस वर्षांची कारकीर्द पाहिली तर तुम्हालाही वाटेल की आम्हाला कुठेतरी संधी दिली पाहिजे. 80 वर्षाच्या लोकांनी आता आशीर्वाद आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांना अप्रत्यक्ष निवृत्तीचा सल्ला दिलाय. ते काल गुरुवार (४ जानेवारी)रोजी सुविचार गौरव पुरस्कार कार्यक्रमात नाशिकमध्ये बोलत होते.
चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे : समाजातील अनेक चांगल्या व्यक्ती, संघटना व संस्था गावपातळीपासून ते आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपलं कार्य करत असतात. त्यांना शोधून सार्वजनिकदृष्ट्या समाजासमोर आणून त्यांचा गौरव करणं, त्यांचा आदर्श इतरांसमोर ठेवून त्यांनाही चांगल्या कामासाठी प्रेरित करण्याचं सुविचार मंचाचं कार्य उल्लेखनीय आहे. समाजात चांगल्या विचारांचा प्रसार झाला पाहिजे कारण त्यातूनच सुसंस्कृत समाजाची निर्मिती होत असते. यादृष्टीने अनेक संस्था काम करतात. याचाच एक भाग म्हणून सुविचार मंचाचे कार्य अधोरेखित करण्यासारखे आहे असे गौरवोद्गार यावेळी अजित पवार यांनी काढले.
निस्वार्थ मदत : कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करण्यासोबतच नैसर्गिक आपत्तीतही पीडित नागरिकांना निःस्वार्थ मदत करण्याचे मोलाचे कार्य सुविचार मंचच्या माध्यमातून होत आहे. तरुण पिढीनेही याचा आदर्श घेवून समाजाप्रती आपलं योगदान दिलं पाहिजे. नेहमी सकारात्मक विचार करून पुढे गेलं पाहिजे. अनेक अनाकलनीय परिस्थितीत संकटे येऊन माणूस जेव्हा हतबल होतो. त्यावेळी त्याच्या पाठिशी मानसिक व नैतिक आधार उभा करून त्याला धीर देणं व पुन्हा उभारी घेण्यासाठी मदतीचा हात देणं हेसुद्धा मोठं कार्य ठरू शकतं. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुविचार मंचाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध कार्याचा गौरव केला. तसंच, पुरस्कारार्थींचंही त्यांनी यावेळी कौतुक केलं.
दादा मला वाचवा : याच पुरस्कारसोहळ्यात बोलत असताना गायक सुरेश वाडकर यांनी दादा मला वाचवा असं म्हणत अजित पवारांकडे एका जागेची मागणी केलीय. नाशिकमधल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट आहे. मात्र, इथली अनेक मुलं माझ्याकडे गाणं शिकण्यासाठी मुंबईला येतात. त्यांचा हा त्रास कमी व्हावा म्हणून एक प्रयत्न केला होता. एक जागा घेऊन तिथे संगीत शाळा करायचीय. पण, जागेचं व्यवहारज्ञान नसल्यानं माझी फसवणूक झाली. आपल्याला हे माहितीये. मात्र जवळ-जवळ ९० टक्के काम झालंय. १० टक्के काम का होत नाहीये हे मला कळत नाही. तुम्हीच जरा मनावर घेतलं तर ही शाळा सुरू होऊ शकते. जसं म्हणतात काका मला वाचवा, तसं मी म्हणेन दादा मला वाचवा असं वाडकर म्हणाले तेव्हा कार्यक्रमात एकच हशा पिकला.