नाशिक -पोलीस दलातील बदल्यांच्या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला असून नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुबई येथे कायदा सुव्यवस्था विभागात सहआयुक्त पदी नियुक्ती झाली असून, नाशिकला पोलीस आयुक्त म्हणून दीपक पांडे यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक चेरिंग दोर्जे यांची तुरुंग महानिरीक्षक म्हणून बदली झाली आहे. त्यांच्या जागी पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांची नियुक्ती झाली आहे. तर नाशिक पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांची अमरावतीला पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली आहे.
विश्वास नांगरे पाटलांनी छबी जपत आयुक्तपद सांभाळले
मागील दोन वर्षांपासून नांगरे पाटील यांचा नाशिकमध्ये तळ होता. तरुणांचे आयडॉल म्हणून ते चर्चेत राहिले आणि ही छबी जपत त्यांनी नाशिकच्या आयुक्तपदाची धुरा सांभाळली. ते आयुक्त म्हणून येण्याआधीची परिस्थिती आजही कायम आहे. त्यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी हेल्मेट सक्ती मोहीम राबवली. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, नाशिकच्या बेशिस्त वाहतुकीला ते आकार देऊ शकले नाही. आजही शहरातील वाहनचालक सर्रास वाहतूक नियमांची पायमल्ली करताना दिसतात. कोरोनाच्या काळात काही काळ गुन्हेगारी थंडावली. पण, ती ही लॉकडाऊनमुळे नांगरे-पाटील यांनी त्यांच्या काळात अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केली होती. या टीमवर्क मध्ये दुवा म्हणून नांगरे पाटीलांनी समन्वय म्हणून महत्वाची भूमिका बजावली.