नाशिक- नेलकटरच्या सहाय्याने नागाचे दात काढत त्याचा अमानुषपणे छळ करणाऱ्या कथित सर्पमित्रास वनविभागाने अटक केली आहे. निफाड तालुक्यातील उगाव येथे तीन दिवसांपूर्वी नाना लोखंडे यांच्या घराजवळ कोब्रा जातीचा नाग निघाला होता. याचवेळी शिवाजी साबळे नावाच्या व्यक्तीने त्याला पकडले होते. मात्र, त्यानंतर त्याने नागाचा छळ करण्यास सुरुवात केली होती.
सुरुवातीला त्याने नागाला काठीने मारहाण केली होती. विशेष म्हणजे एवढ्यावरच न थांबता नेलकटरच्या सहाय्याने त्याचे दात उपटत नागाला जखमी केले होते. काही स्थानिक नागरिकांनी हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये चित्रित करत तो व्हॉट्सअॅपवर व्हायरल केला होता. याची दखल घेत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी शोध घेत एका खेडे गावातून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.